Pune News : रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी नामांकित हॉस्पिटलच्या नर्ससह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली. 

पृथ्वीराज संदीप मुळीक (वय 22, रा. साई प्रसाद सोसायटी दत्तनगर पुणे) आणि नर्स नीलिमा किसन घोडेकर ( गोल्डन केअर, हॉस्पिटल भुमकर चौक, हिंजवडी) अशी अटकेत असलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक व्यक्ती रेमडीसिव्हीर इंजेक्शन  अधिक किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.

त्याच्याकडे केलेला अधिक चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण असलेल्या नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. त्यानंतर पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याकरिता पोलिसांची दहा विशेष पथके नेमण्यात आली आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.