Cyber Crime News : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या दोघा सराईतांना अटक

लाखोंचे साहित्य जप्त

एमपीसी न्यूज : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या आंतरजिल्हा सराईतांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केले. त्यांच्याकडून ३५९ बनावट एटीएम कार्ड, १३ स्कीमर, १२ डिजीटल मायक्रो कॅमेरे, २ वॉकीटॉकी, १५ मायक्रो बॅटरीज, ४ लॅपटॉप, ११ मायक्रो सीडीज, १ मोबाईल, कलर प्रिंटर, ५० डाटा केबल असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७)  आणि मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय ३७, दोघेही रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. डेनिस मायकल (वय ३२,रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

मायकल यांच्या बँकखात्यातून ३० नोव्हेंबरला नाशिक येथील एटीएम सेंटर वरून १० ट्रानझाक्शन करून १ लाख रुपये काढण्यात आले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर  पोलिसांनी तपास करीत २०० ते २२५ तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. आरोपी नाशिक येथे असल्याचे समजले. त्यानुसार सायबर पोलिसांनी मोहम्मद भोरादिया आणि मोहम्मद छत्रीवाला यांना नाशिकमधून ताब्यात घेतले.

मोहम्मद छत्रीवाला आणि साथीदाराने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षापासून तो फरार आहे. गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे दोन वर्षे दुबई मध्ये पळून गेला. डिसेंबर २०१९ मध्ये तो हिंदुस्थानात परत आला होता. त्यानंतर  त्याने पुन्हा सायबर गुन्हे सुरू केले. इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा पर्यंत त्याचे शिक्षण झाले असून दुसरा आरोपी अल्पशिक्षित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.