Dighi Crime News : हॉटेलमध्ये घुसून मारहाण करत रोकड लुटली; दोनजण अटकेत

एमपीसी न्यूज – हॉटेल मध्ये दोन भाऊ काम करत असताना दोघांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. एकाने भाजी कापण्याच्या चाकूने मारून जखमी केले तर एकाने दुस-या भावाला पकडून ठेवत हॉटेलच्या काउंटरमधून साडेतीन हजारांची रोकड काढून जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 23) दुपारी एक वाजता दिघी जकात नाका येथे घडली.

संदीप शिवाजी अमृळे (वय 19, रा. दिघी. मूळ रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहन रमेश झरेकर (वय 23, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), रोहन संजय माने (वय 19, रा. डोळस वस्ती, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे दिघी जकात नाका येथे हॉटेल आहे. शनिवारी दुपारी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ समाधान दोघेजण हॉटेल मध्ये काम करत असताना फिर्यादी यांच्या ओळखीचे आरोपी हॉटेलमध्ये आले.

त्यांनी विनाकारण हॉटेलमध्ये खुर्ची, टेबलची तोडफोड केली. त्यांना अडवण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ गेले असता एकाने फिर्यादी यांना भाजी कापण्याच्या चाकूने मारले. तर आरोपी रोहन याने फिर्यादी यांच्या भावला पकडून ठेवत हॉटेलच्या काउंटरमधून तीन हजार 540 रुपये रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपी निघून गेले. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.