Nigdi : कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी दोघांना अटक; पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने खून

एमपीसी न्यूज – टपरीवर सिगारेट पित थांबलेल्या एकावर दोघांनी कोयत्याने सपासप वार करून खून केला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली. आरोपींने त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.

विल्सन उर्फ अविनाश पतीराज डेमेन्टि (वय 26, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव), दीपक देवेंद्र गवळी (वय 18, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नंदू वसंत चव्हाण (रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 5) दुपारी तीनच्या सुमारास नंदू अजंठानगर येथील एका टपरीवर सिगारेट पिण्यासाठी थांबला असता त्याचा दोघांनी कोयत्याने वार करून खून केला. घटनेनंतर निगडी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी खेड तालुक्यातील आंबेगाव येथे गेल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार एक पथक खेडच्या दिशेने रवाना करण्यात आले.

दरम्यान, पुणे-नाशिक रोडवर चाकणकडून मोशीच्या दिशेने दोघेजण दुचाकीवरून तोंडाला काळे कापड बांधून जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चिंबळी येथे शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनीच हा खून केल्याचे कबूल केले आहे. विल्सन याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हा खून केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींकडून एक अॅक्टिवा आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.