Chikhali Crime News : सचिन चौधरी अपहरण आणि खून प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मित्रांनीच मित्राचे पैशांच्या आणि वर्चस्ववादातून अपहरण केले. मावळ तालुक्यातील परंदवडी येथे नेऊन त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पवना नदीत फेकून दिला. याबाबत 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सनी उर्फ नकुल अनिल कुचेकर (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), गौरव रमेश डांगले (वय 22, रा. जुना जकात नाका, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. योगेश सावंत, गुड्ड्या भालेराव, रुप्या आणि त्याचे सात ते आठ साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण हुकमाराम चौधरी (वय 47, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन चौधरी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.11) रात्री फिर्यादी यांचा मयत मुलगा सचिन त्यांच्या घरी झोपला होता. रात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या घरी आले. आरोपींनी सचिनला उठवून जबरदस्तीने उठवून पैशांच्या व्यवहारातून एका कारमधून त्याचे अपहरण केले.

त्यानंतर आरोपींनी सचिनचा मावळ तालुक्यातील परंदवडी येथील जुन्या बेबडओहळच्या पुलावर काठीने आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर सचिनचा मृतदेह पुलावरून नदीच्या पाण्यात फेकून दिला. मृतदेह काही अंतर वाहून गेला आणि एका ठिकाणी अडकून बसला.

चिखली पोलिसांसोबत गुन्हे शाखेचे पोलीस देखील सचिन आणि आरोपींचा शोध घेत होते. पोलिसांना सचिनचा मृतदेह पवना नदीच्या पाण्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.