Dehuroad News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक; दोन पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे. ही कारवाई माळवाडी देहूगाव येथे करण्यात आली.

राम परशुराम पाटील (वय 27, रा. मल्हारनगर कॉलनी, थेरगाव), राजू बसवराज माने (वय 28, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील टॉप 25 आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निशांत काळे आणि गणेश गिरीगोसावी यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार राम पाटील हा परंडवाल चौक, माळवाडी, देहूगाव येथे थांबला आहे. त्याच्याकडे पिस्टल आहे.

त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने परंडवाल चौकात सापळा लावून राम पाटील याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार 400 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करत त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आरोपी राम पाटील याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिस्टल आणि काडतुसे राजू माने यांच्याकडे घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राजू माने याचा शोध घेऊन त्याला यशोदीप चौक, वारजे माळवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी आणखी एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

पोलिसांनी एकूण देशीबनावटीची दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा 80 हजार 800 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला. आरोपी राम पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात वाकड, देहूरोड आणि खडकी पोलीस ठाण्यात दरोडा जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार निशांत काळे, सुनील कानगुडे, किरण काटकर, गणेश गिरीगोसावी, प्रदीप गोडांबे, शैलेश मगर, अशोक गारगोटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.