Pune Crime News : पुण्यातील व्यावसायिकाचे 97 लाख रुपये घेऊन पळालेला कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एका मसाले व्यावसायिकाचे 97 लाख रुपये घेऊन चालकाने पळ काढला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. कर्जत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून 60 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

विजय महादेव हुलगुंडे (वय २५, रा. अहमदनगर) आणि नाना रामचंद्र माने (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत ५० वर्षीय व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मार्केट यार्ड परिसरात सुखा मेवा आणि मसाल्याच्या होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी विजय त्यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. दररोजच्या व्यवसायातून जमा झालेली रक्कम ते बँकेत भरत असत. परंतु, गेल्या काही दिवसांमधील रोकड त्यांनी बँकेत भरणा केली नव्हती. त्यांना मुळगावी जायचे होते. त्यामुळे त्यांनी जमलेली ९७ लाख रुपयांची रोकड नातेवाईकांकडे देण्यासाठी सोमवारी सायंकाळी कार चालक विजय याला घेऊन निघाले होते.

दरम्यान वाहतूक कोंडी त्यांची गाडी अडकल्याने येरवड्यातील एचएसबीसी कंपनीजवळ आल्यानंतर लघुशंका लागल्याने त्यांनी विजयला कार बाजूला घेण्यास सांगितली. कार बाजूला घेतल्यानंतर ते लघुशंका करण्यास कारमधून उतरले. पण, त्याचवेळी चालक कार घेऊन पसार झाला. काही अंतरावर कार आढळली, पण त्यातील 97 लाखांची रोकड आणि चालक विजय पळाला होता. या गुन्ह्याचा तपास येरवडा पोलीस करत होते.

याच दरम्यान विजय हा कर्जतमधील असल्याने ही माहिती कर्जत पोलिसांना दिली होती. त्यांनी माहिती काढली असता आरोपी पुरंदर तालुक्यातील वीर गावात असल्याचे समजले. ही माहिती पुणे पोलिसांना कळवत कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने या दोघांना सापळा रचून पकडले. यावेळी पुणे पोलीस देखील येथे दाखल झाले होते. विजय पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला पाठलागकरून पकडले. या दोघांकडून 60 लाख रुपये जप्त लेले आहेत. तर उर्वरित 32 लाख रुपयांबाबत तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.