Wakad Crime News : ताथवडे चौकात खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून खून

एमपीसी न्यूज – ताथवडे चौकात खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीसोबत किरकोळ कारणावरून वाद घालत तिघांनी मिळून मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री घडली असून जखमी व्यक्तीचा सोमवारी (दि. 15) मृत्यू झाला आहे.

मल्लिकार्जुन उर्फ मल्लू अवधूत पतडे (वय 49, रा. ताथवडे गाव, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मी मल्लिकार्जुन पतडे (वय 20) यांनी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी फिर्याद दिली. त्यानुसार ऋषीकेश चपाले, महेश पवार (दोघे रा. ताथवडे), पवन सिंग (रा. पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मयत वडील मल्लिकार्जुन पतडे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास ताथवडे चौकात खरेदीसाठी गेले होते. रावेत-डांगे चौक रस्त्यावर असलेल्या एका हातगाडीच्या समोर मल्लिकार्जुन आणि आरोपींचा किरकोळ कारणावरून वाद झाला. आरोपींनी शिवीगाळ करत मल्लिकार्जुन यांना पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यामध्ये मल्लिकार्जुन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.