Chinchwad News : भोसरी, हिंजवडीत दोन घरफोड्या; पावणे नऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : भोसरी आणि हिंजवडी परिसरात घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 8 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत रविवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात संजय गजानन कंडारकर (वय 56, रा. भोजराज कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या घराला लावलेल्या कुलुपाची चावी घराबाहेर ठेवलेल्या बुटात ठेवली होती. अज्ञात चोरट्याने रविवारी सकाळी दहा ते दुपारी साडेचार या कालावधीत बुटातून चावी घेऊन कुलूप उघडले आणि घरात प्रवेश केला. घरातून 29 हजार 700 रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात राजेंद्र रामभाऊ विनोदे (वय 49, रा. विनोदेनगर, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. विनोदे यांच्या भावाचे घर कुलूप लावून बंद होते. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून 4 लाख 55 हजारांचे सोन्याचे गंठण, 2 लाख 80 हजारांचा सोन्याचा गोफ, 35 हजारांची सोन्याची पिळ्याची अंगठी, 40 हजारांची चांदीची भांडी आणि 12 हजारांची रोकड चोरून नेली.

तसेच चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराजवळ असलेल्या वन स्टॉप सुपर मार्केट या दुकानात देखील चोरी केली आहे. दुकानातून 15 हजारांच्या कॉस्मेटिक वस्तू आणि चार हजारांची चिल्लर असे दोन्ही घटनांमध्ये एकूण 8 लाख 41 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

मोशी, निगडीतही चोरीचे प्रकार

आदिनाथ गौतम घुमरे (वय 23, रा. तापकीरनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुमरे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने रविवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी, त्यांचे आई, वडील, भाऊ सर्वजण घरात झोपले होते. चोरट्यांनी घरातून 12 हजारांचा एक मोबाईल फोन चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

बिभीषण सूर्यभान कदम (वय 60, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम यांचा ट्रक (एम एच 12 / एफ झेड 7522) शनिवारी (दि. 16) रात्री भक्ती शक्ती पुलाच्या खाली अंधारात पार्क केला होता. रात्री सव्वा बाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकला बांधलेली ताडपत्री खोलून ट्रकमधून 28 हजार 336 रुपये किमतीच्या सात एक्साईड बॅटरी चोरून नेल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.