Pune : टँकर व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात दोन पत्रकारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – टँकर व्यावसायिकाला 30 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा (Pune) पोलिसांनी दोन पत्रकारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी विलास गुलाबराव देशमुख (वय 64, रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून उदय पोवार (वय 40, रा. लोहगाव) आणि शब्बीर शेख (वय 39, रा. विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांचा टॅंकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. पोवार आणि शेख या दोघांनी देशमुख यांच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी केल्याने त्यांनी पैसे दिले. मात्र त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली. देशमुख यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी टॅंकरचालक संजय मुधोळकर यांना फोन करून टॅंकरचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. याबाबत देशमुख यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.