Lonavla News : इंदौर-दौंड रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने लोकल सेवा विस्कळीत

एमपीसी न्यूज – इंदौर-दौंड रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरल्याची घटना सोमवारी (दि. 27) सकाळी घडली. त्यानंतर डबे रुळावर आणून रेल्वे सोडण्यात आली. मात्र यामध्ये लोणावळा-पुणे लोकल सेवा विस्कळीत झाली.

02944 इंदौर-दौंड स्पेशल ट्रेन सकाळी 7.50 वाजता लोणावळा स्थानकात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येत असताना मागील बाजूचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ डबे रुळावर आणण्याचे काम सुरू केले. काही वेळेत डबे रुळावर आणून गाडी पुढे सोडण्यात आले.

या घटनेमुळे लोणावळा-पुणे लोकल सेवा विस्कळीत झाली. 01481 ही लोणावळा-पुणे लोकल सकाळी 8.20 वाजता सुटते. ही लोकल सुमारे 20 मिनिटे उशिरा धावली. तर 01485 ही लोणावळा-पुणे लोकल सकाळी 10.05 वाजता सुटते. ही लोकल लोणावळा येथून न सुटता तळेगाव येथून सुटली.

डबे घसरल्याच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूपपणे पुढे पाठवण्यात आले. मात्र यामुळे लोणावळा, मळवली, कामशेत, कान्हे आणि वडगाव येथून पुण्याकडे लोकलने कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.