Chinchwad News : दोन दिवसीय नाट्य महोत्सव उत्साहात,150 मान्यवरांचा सन्मान

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडमध्ये दोन दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरत जाधव अभिनित ‘मोरुची मावशी’ आणि संकर्षण कर्‍हाडे अभिनित ‘तू म्हणशील तसे’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पत्रकार, माध्यम प्रतिनिधी, सांस्कृतिक व सामाजिक संस्था, कलाकार व्यक्ती अशा सुमारे 150 जणांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

अभिनेता भरत जाधव अभिनित, आचार्य अत्रे लिखित ‘मोरुची मावशी’ ह्या विनोदी नाटकाचा शनिवारी (दि.18) प्रयोग सादर झाला. यावेळी सुमारे 48 माध्यम प्रतिनिधींचा गौरव भरत जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीस परिषदेच्या गेल्या 25 वर्षांतील कला व विविध कार्ययात्रेचा आढावा घेणारी व नंतर पवार साहेबांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक योगदानाचा आलेख दर्शविणारी, अशा दोन चित्रफिती दाखविण्यात आल्या.

यावेळी इतर मान्यवरांत अभिनेते भरत जाधव, सर्वश्री नंदकिशोर कपोते, रविकांतजी वरपे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विशाल वाकडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी प्रास्ताविक केले. भरत जाधव यांनी सध्याच्या कोरोना काळातही प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उत्स्फुर्त प्रतिसादाचे व परिषदेच्या विविध उपक्रमांचे तसेच 25 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे मनापासून कौतुक केले. सातत्याने एखादी संस्था 25 वर्षे कार्यरत असणे हे दुर्मिळ आहे आणि ते परिषदेची ही शाखा अखंडपणे करीत आहे, हे कौतुकास्पद आहे तसेच प्रेक्षकांनी नाटकास उदंड प्रतिसाद देऊन नाट्य कलावंतांना उभारी देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारी, 19 तारखेस संकर्षण कर्‍हाडे लिखित व अभिनित, प्रसाद ओक दिग्दर्शित ‘तू म्हणशील तसे’ या अतिशय सुंदर नाटकाचा प्रयोग सादर झाला. या प्रयोगाआधी विविध संस्था प्रतिनिधी व कलाकार व्यक्ती यांचा गौरव संकर्षण कर्‍हाडे यांचे हस्ते झाला. पुणे, तळेगांव दाभाडे, शिरुर, दोंड, पुणे व मुंबई येथील नाट्यपरिषद शाखा, पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकारिणी सदस्य यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, तळेगाव दाभाढे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, दौंड शाखेचे अध्यक्ष प्रमोद कांबळे, नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पिं.चि. युवती अध्यक्षा वर्षा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना परिषदेने गेल्या 25 वर्षांतील सहकार्य करणाऱ्यांना मनापासून बोलावून सत्कार केल्याबद्दल कौतुक केले. तसेच माझ्या वयापेक्षा दुप्पट अनुभव असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान मी करत असल्याने मला अवघडल्या सारखे वाटते असेही म्हणाले. परिषदेची अशीच पन्नास, शंभर वर्षे होवोत आणि रसिकांनी परिषदेवर असेच मानापासून प्रेम करीत राहावे ही कामना व्यक्त केली.

तसेच आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी कोरोना काळातील गेली दोन वर्षे नाट्यकलावंतांसाठी किती अवघड गेली यावर भाष्य केले तसेच कोरोना अजूनही गेलेला नसून कुणीही त्याबद्दल अनभिज्ञ राहू नाहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी परिषदेला गेल्या 25 वर्षे ज्ञात अज्ञातपणे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली व असेच सहकार्य आणि रसिकांचे असेच प्रेम यापुढेही मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी परिषदेच्या 25 वर्षांतील सुवर्ण क्षणांच्या आठवणींची छायाचित्रे आणि पवार साहेबांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातील उदबोधक छायाचित्रे व रेखाचित्रे यांचे अतिशय भव्य प्रदर्शन कैलास भिंगारे यांचे सहाय्याने प्रदर्शित केले होते.

सर्वश्री सुहास जोशी, किरण येवलेकर, नरेंद्र आमले, जयराज काळे, संतोष शिंदे, राजेंद्र बंग, संतोष रासने गौरी लोंढे, रुपाली पाथरे, सुदाम परब, राहुल भोईर, रवींद्र यंगड, व सागर मोरे, गणेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.