Pune : दोन श्वान भगिनी पोलीस दलातून निवृत्त ; राणी व राधा या श्वानांना सन्मानाने निरोप

एमपीसी न्यूज- पोलिसांना अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे ( एलसीबी) श्वान ‘राणी’ आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हे दोन श्वान निवृत्त झाले आहेत. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून पोलीस दलात दाखल झालेले हे दोन्ही श्वान 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर या दोन्ही श्वानांना पुणे ग्रामीण पोलिसांनी एका खास कार्यक्रमात शुक्रवारी (दि. 30 नोव्हेंबर) सन्मानाने निवृत्ती दिली.

पोलीस दलात दाखल झाल्यानंतर नऊ महिन्यांचे शिस्तबद्ध पोलीस प्रशिक्षण घेतलेल्या लॅबराडोर जातीच्या राणी व राधा या दोन श्वान म्हणजे पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण व बॉम्ब शोधक व नाशक पथकातील गुन्हे शोधक श्वान पथकाची शान होत्या. दोन महिन्यांच्या असताना पुणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल झालेल्या राणी पाठोपाठ तिचीच बहीण राधाचाही समावेश झाला होता. गेल्या दहा वर्षात यातील राणीने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आले आहे.

पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील ऊस तोड महिलेचा खून, खेड तालुक्यातील आव्हाटवाडी खून प्रकरण, बारामती मधील भांबुर्डी येथील चिंकारा शिकार प्रकरण, रांजणगाव ( ता. शिरूर) येथील महिलेचे खून प्रकरण, शिरूर मधील एसबीआय बॅंकेवरील दरोडा, दौंड तालुक्यातील दरोड्यातील आरोपींचा छडा, जेजुरी येथील अल्पवयीन मुलीचे बलात्कार व खून, तक्रारवाडी ( भिगवण) येथील अल्पवयीन बेपत्ता मुलाचा खून अशा प्रत्येक वेळेस गुन्हेगाराचा माग काढण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका राणी श्वानाने बजावली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वान ‘राधा’ हिची देखील पोलिसांना विविध गंभीर घटनांमध्ये मोलाची साथ मिळाली होती.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे निवृत्तीच्या वेळी राणी व राधाचे हँडलर ( हस्तक) पोलीस नाईक गणेश फापाळे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.