Chakan : सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाक्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना चाकणमध्ये अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाक्यावर टोल देण्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यावर  गोळीबार केला. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन  आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथे अटक केली. दोन्ही आरोपी पुणे शहर पुणे ग्रामीण आणि अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

रोहिदास उर्फ बाबू अनंता चोरगे (वय 45, रा. वांगणी, ता. वेल्हा, जि. पुणे, सचिन राजाराम ढोरे (वय 30, रा. केसनंद ता. हवेली, जि पुणे) अशी अटक  केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 मार्च 2019 रोजी आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार कोल्हापूर येथून राजकीय सभेवरून परत येत होते. त्यावेळी आणेवाडी टोल नाका येथे टोल भरण्याच्या कारणावरून त्यांची टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. यामध्ये आरोपींनी कर्मचाऱ्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. याबाबत सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. गुन्ह्याचे स्वरूप आणि व्याप्ती पाहता या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. रोहिदास आणि सचिन पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

रोहिदास आणि सचिन चाकण चौक येथे येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.

दोन्ही आरोपी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दंगल घडविणे व शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी रोहिदास याच्यावर यापूर्वी  पुणे ग्रामीणच्या वेल्हा पोलिसांनी मोक्काची कारवाई केली होती. मोक्कामधून तो जानेवारी 2019 मध्ये बाहेर आला होता. त्यानंतर लगेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यावर गोळीबाराचा गुन्हा त्याने केला. पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी गणेश सावंत, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, प्रवीण पाटील, सचिन मोरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.