Cyclone Nisarga Effect : शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना

Two incidents of tree falling in Landewadi and Shahunagar, two cars damaged in both cases. शहरभरातून पिंपरी-चिंचवड अग्निशामन दलाला दुपारी 2 वाजेपर्यंत झाडपडीचे 16 काॅल, अग्निशामन दलाच्या सर्व गाड्या झाडपडीच्या निवारणासाठी रवाना.

एमपीसी न्यूज – लांडेवाडी, शाहूनगर, चिंचवड गाव येथे तीन कारवर झाड पडल्याच्या घटना आज (बुधवारी, दि. 4) दुपारी घडल्या आहेत. तर थेरगाव येथे दुकानांसमोरील पत्रे पडले आहेत. दरम्यान, मंगळवार पासून शहरात सुरू असलेल्या जोरदार पाऊस आणि वादळात सुमारे 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

लांडेवाडी येथे राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या बाजूला सौरभ यादव यांनी त्यांची हुंडाई वेरणा कार (एम एच 14 / एच डब्ल्यू 8575) पार्क केली होती. आज सकाळी आलेल्या जोरदार वादळात एक झाड कारवर पडले. त्यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुसऱ्या एका घटनेत शाहू नगर येथील शाहू गार्डन शेजारी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या एका कारवर झाड पडले आहे. यातही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तिसऱ्या घटनेत थेरगाव येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या समोरील पत्रे वाऱ्याने पडले आहेत.

चौथ्या घटनेत पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात एक मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड रस्त्याच्या बाजूला असलेल्या पीएमपीएमएल बस स्टॉपवर पडले. बस स्टॉपच्या जवळ असलेल्या दुचाकी आणि रिक्षाचे देखील या घटनेत नुकसान झाले आहे. झाडाच्या पडण्याचा आवाज आल्याने बस स्टॉपवर थांबलेले प्रवासी नागरिक दूर पळाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

पाचव्या घटनेत चिंचवड गावातील इंद्राविहार सोसायटी जवळ इनोव्हा कारवर (एम एच 14 / सी डी 1111) झाड पडले. यात कार चेंबली गेली आहे.

सहाव्या घटनेत यतीन टोके यांनी त्यांची मारुती सेलेरिओ (एम एच 14 / जी एस 2961) वाकड येथील वेणूनगर येथे पार्क केली होती. वादळात रस्त्याच्या बाजूला असलेले एक मोठे सुकलेले झाड उन्मळून कारवर पडले. यातही कारचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात मंगळवार (दि. 2) पासून बुधवारी (दि. 3) दुपार पर्यंत सुमारे 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. बहुतांश झाडे रस्त्यावर पडली असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, महापालिका प्रशासन व अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ झाडे हटवून वाहतूक सुरळीत चालू केली आहे.

आज दुपारपर्यंत चक्रीवादळ महाराष्ट्राच्या कोकण आणि मुंबई किनारपट्टीवर धडकले. दरम्यान समुद्राच्या किनारपट्टीसह राज्यभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात वादळ सुटत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.