Pune News : खुनासह दरोडा व घरफोडीचे 19 गुन्हे दाखल असलेले दोन सराईत चोरटे जेरबंद 

घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस ; पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी 

एमपीसी न्यूज – खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी प्रकारचे एकूण 19 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने ही कामगिरी केली. 

_MPC_DIR_MPU_II

अजय राजू अवचिते (वय 27, वर्षे रा.आलेगाव पागा, ता.शिरुर, जि.पुणे) व गणेश उर्फ ठोम्या गौतम भोसले (वय 27, रा. आलेगाव पागा, ता.शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपींकडून घरफोडी चोरीचे एकूण 11 गुन्हे उघडकीस आणून 13 तोळे 8 ग्रॅम सोन्याचे दागिने व 9 तोळे 4 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच, एक गॅस सिलेंडर असा 5 लाख 37 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी हडपसर, लोणीकाळभोर, जेजूरी , बारामती शहर, बारामती तालुका, सासवड, भिगवण, खेड, यवत, शिरुर या पोलीस स्टेशनला खुनासह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी इत्यादी प्रकारचे एकूण 19 गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्चला भिवरी ता.पुरंदर गावच्या हद्दीत पाच लाख नव्वद हजार रुपयांची घरफोडी झाली होती. त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय अवचिते यानेच केला असल्याची सीसीटीव्ही फुटेजवरुन खात्री झाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पो.नि. सचिन काळे, पोहवा. चंद्रकांत झेंडे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरू गायकवाड, पो.ना. सागर चंद्रशेखर, चापोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.