Chinchwad News : भोसरी, चिंचवड, चिखली, बावधन मधून दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी, चिंचवड, चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी वायर, दुचाकी, डिझेल, पेट्रोलची टाकी आणि सीट असा एकूण दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

एमआयडीसी भोसरी मधून दीड लाखांची वायर चोरीला

एमआयडीसी भोसरी परिसरातील एका इलेक्ट्रिक दुकानातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 55 हजारांची वायर चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी उघडकीस आली. ज्ञानदेव दिलीप पाटील (वय 34, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे भोसरी एमआयडीसी परिसरात श्री इलेक्ट्रिकल्स नावाचे दुकान आहे. हे दुकान सोमवारी (दि. 25) रात्री नऊ ते मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊ या कालावधीत बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील इनॅमेल्ड कॉपर वाइंडिंग वायरचे 10 बंडल असा एकूण एक लाख 55 हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाल्हेकरवाडी येथे सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली. पुरु महेश गावडे (वय 23, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक लाख पाच हजार रुपये किमतीची दुचाकी हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. 24) सायंकाळी पाच ते सोमवारी (दि. 25) सकाळी सात या कालावधीत घडला.

जाधववाडी येथे दुचाकीची पेट्रोलची टाकी चोरीला

पेट्रोल चोरीनंतर आता पेट्रोलच्या टाक्या देखील चोरटे चोरून नेत आहेत. जाधववाडी चिखली येथे असा एक प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची पेट्रोलची टाकी आणि सीट चोरून नेली आहे. सुरज प्रकाश चौधरी (वय 28, रा. गणेशनगर, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे गणेशनगर, जाधववाडी येथे ड्रायव्हिंग स्कूल आहे. फिर्यादी यांच्या मित्राच्या नावे असलेली दुचाकी ड्रायव्हिंग स्कूलच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची पाच हजार रुपये किमतीची पेट्रोल टाकी व सिट झोप येते चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 23) सायंकाळी सहा ते रविवारी (दि. 24) सकाळी सात या कालावधीत घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

बावधन येथे ट्रकमधून 200 लिटर डिझेल चोरीला

बावधन येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी 200 लिटर डिझेल चोरून नेले. राकेश विजयसिंग (वय 32, रा. नगला, पटपर, साथनी, अलिगढ, साधिनी उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. त्यांनी त्यांचा ट्रक मंगळवारी पहाटे चार वाजता बावधन येथील मारुती सुझुकी कंपनी समोर रस्त्याच्या बाजूला पार्क केला. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या डिझेल टॅंकचे लॉक खोलून 20 हजारांचे 200 लिटर डिझेल चोरून नेले. हा प्रकार सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.