Chinchwad : खंडणी मागत तरुणाचे अपहरण करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तीन लाखांची खंडणी मागत तीन जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली. या प्रकरणातील दोन जणांना चिंचवड पोलिसांनी अटक केली.

चंद्रकांत महादेव कांबळे (वय 27, रा. लिंक रोड), अभिजित राजेंद्र इंगवले (वय 24, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यशवंत ताडीवाल आणि अन्य एकजण अद्याप फरार आहेत. ओंकार ज्ञानदेव वटाणे (वय 24, रा. चिंचवड), असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ओंकार याचे चिंचवडमधील केसर हॉटेल समोरून अपहरण केले. त्याला जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसवून नेले. ओंकारकडे आरोपींनी तीन लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. ओंकार यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली काही वेळेनंतर आरोपींनी ओंकार यांना चिंचवड येथे सोडून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील आरोपी ईगल हॉटेल समोरील ओव्हरहेड ब्रिजखाली येणार असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दोघांना पोलिसांनी हटकले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करून लागले. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. तीन जणांनी मिळून हा गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश अटवे, पोलीस कर्मचारी दत्ता गायकवाड, सुधाकर आवताडे, जयवंत राऊत, सचिन वेर्णेकर, अमोल माने, रुपाली पुरीगोसावी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.