Pune : पुणे रेल्वे स्थानकावरून दोन महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण

एमपीसी न्यूज – पाच मुलांना घेऊन रेल्वे स्थानकावर थांबलेल्या महिलेच्या एका मुलीला लघुशंका आली. दोन महिन्याच्या चिमुरड्याला प्लॅटफॉर्मवरील हातगाडीच्या झोळीत टाकून मुलीला लघुशंकेसाठी महिला घेऊन गेली. दरम्यान, झोळीत झोपलेल्या चिमुरड्याचे अज्ञातांनी अपहरण केले. ही घटना पुणे रेल्वे स्थानकावर गुरुवारी (दि. 8) दुपारीतीन च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर घडली.
लक्ष्मी राजू चव्हाण (वय 35, रा. पुणे. मूळ रा. मेहबूब नगर, अंकिला कोडापूर तांडा, हैद्राबाद) यांनी याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मजुरीचे काम करतात. त्या त्यांच्या पाच मुलांना घेऊन कामाच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. काम न मिळाल्याने रस्त्यावर फिरून भीक मागून पोट भरण्याचे काम त्या करत आहेत. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या त्यांच्या पाच मुलांसह पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या एका लहान मुलीला लघुशंका आली. प्लॅटफॉर्मवर लावलेल्या एका हातगाड्याला बांधलेल्या झोळीत त्यांनी त्यांच्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला झोपवले आणि मुलीला लघुशंकेसाठी घेऊन गेल्या. मुलीला लघुशंकेवरून घेऊन आल्यावर त्यांनी झोळीत टाकलेल्या मुलाला पाहिले. मात्र, झोळीत मुलगा दिसला नाही.
लक्ष्मी यांनी दोन दिवस मुलाचा सर्वत्र शोध घेतला. परंतु त्यांचा मुलगा सापडला नाही. त्यामुळे शनिवारी त्यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ पाच तपास पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली. पुणे लोहमार्ग पोलीस तपास करीत आहेत.
पळवून नेलेला मुलगा रंगाने गोरा आहे. वय दोन महिने, काळे केस, लंगोट बांधलेले आहे. अशा वर्णनाचा लहान मुलगा आढळून आल्यास पुणे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.