Pimpri: औद्योगिकनगरीतून दोन खासदार, तीनही आमदार शिवसेनेचेच हवेत – गोविंद घोळवे 

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्वांनी गट-तट विसरुन एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरुर मतदार संघातून शिवसेनेचे खासदार तर निवडून येणारच आहे. त्याचबरोबर तीनही आमदार शिवसेनेचेच निवडून आण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन  शिवसेनेचे राज्य संघटक व जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी केले. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उध्दवश्री पुरस्कार सोहळा समितीच्यावतीने दिले जाणा-या उध्दवश्री पुरस्काराचे आज (बुधवारी)शिवसेनेचे नेते व राज्याचे उद्योग, खणीकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भोसरीत वितरण झाले. या कार्यक्रमात घोळवे बोलत होते.

घोळवे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक, कामगारनगरी आहे. शिवसेना बलाढ्य संघटना आहे. शहरात संघटना वाढीस मोठा वाव आहे. माझ्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन 15 वर्षापुर्वी मला शिवसेनेने पुरस्कार देऊन गौरविले होते. ही भुषणावह आणि कौतुकाची बाब आहे. त्याच शिवसेनेत आज मी राज्य संघटक म्हणून काम करत आहे. शिवसेनेत कार्याची दखल घेतली जाते. काम करणा-यांना पदे दिली जातात. तुमच्यातील गुण हेरले जातात. जाती-पातीचा विचार न करता शिवसेनेत उपेक्षित, दिन, दलितांना न्याय दिला जातो.

आगामी लोकसभेला शिरुर आणि मावळ मतदार संघातून दोन्ही खासदार शिवसेनेचे निवडून येणारच आहेत. पिंपरीत आपला आमदार आहे. आता चिंचवड आणि भोसरी विधानसभेवर देखील भगवा फडकला पाहिजे. यासाठी शिवसैनिकांनी एकदिलाने काम करावे, असेही घोळवे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.