Pune Corona Update : पुण्यात ओमायक्राॅनच्या दोन नव्या व्हेरीयंटचा शिरकाव; राज्यात पुन्हा कोरोना संकट?

एमपीसी न्यूज – राज्यात पुन्हा एकदा कोरोना संकटाने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याचा दिलासा मिळतोच तर पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटने शिरकाव केल्याने आता चिंतेत भर पडली आहे. पुण्यात ओमायक्राॅनचे दोन नवे सब व्हेरीयंट सापडले असून एकून सात जणांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यात पुन्हा कोरोना संकटाची चाहुल लागल्याने आरोग्य खाते चांगलेच खडबडून जागे झाले आहे. शहरात ओमायक्राॅनच्या दोन व्हेरीयंटची म्हणजेच BA4 and BA5 याची सात जणांना लागण झाल्याचे समोर आले. BA4 चे चार आणि BA5 चे तीन रुग्ण आढळले असून त्यात चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सात रुग्णांपैकी चार रुग्णांचे वय 50 पेक्षा जास्त आहे, तर दोन रुग्ण 20 – 40 या वयोगटातील आहेत. एक रुग्ण दहा वर्षाखालील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचा हा नवा व्हेरीयंट संसर्गजन्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे सगळ्यांनीच सावधगिरीने पावले उचलण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

बुस्टर डोसची गरज आहे का?

लसीकरणाबाबत राज्यात विविध कारणांमुळे उदासीनता दिसून येते. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला तरी दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमालीची कमीच पाहायला मिळत आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेऊन बुस्टर डोस घेणे जरूरीचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ओमायक्राॅनच्या BA2 प्रमाणेच BA4 आणि BA5 ची लक्षणे आहेत. या नव्या व्हेरीयंटचा पहिला रुग्ण तमिळनाडू तर दुसरा तेलंगणामध्ये सापडला होता, मात्र महाराष्ट्रात या नव्या कोरोना व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाचे हे नवे व्हेरीयंट संसर्गजन्य असले तरी घातक नाही, परंतु प्रत्येकाने याबाबत खबरदारी घेऊन काळजी घ्यावी असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.