Pune Crime : आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये दोघांनी स्वॅब दिले फेकून ; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

0
एमपीसी न्यूज – आंबेगाव खुर्द येथील कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये स्वॅब फेकून देणाऱ्या दोघांविरोधात मंगळवारी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.
 आंबेगाव खुर्द येथील स्वॅब सेंटरमध्ये आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच करू देणार नाही, असे म्हणत दोघांनी गोंधळ घातला.
शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे असे दोन्ही आरोपींचे नाव असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने ज्या नागरिकामध्ये करोनाची लक्षणे आहेत, त्यांची तपासणी करण्यासाठी अनेक ठिकाणी स्वॅब सेंटर सुरू केले आहे. आंबेगाव बुद्रुक येथील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृह येथे सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 15 सप्टेंबर) सकाळपासूनच नागरिक कोरोना तपासणीसाठी आले होते.

दुपारी शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे हे दोघे देखील तिथे तपासणीसाठी आले होते. ते दोघे पुढे येऊन, आमची अगोदर टेस्ट करा, नाही तर आम्ही कोणाचीच टेस्ट करू देणार नाही असे म्हणाले, त्यावर महापालिकेचे कर्मचारी म्हणाले की, सर्वांची तपासणी होणार आहे. लाईनमधील दोन आणि सामान्य नागरिक यांच्या लाईनमधील दोन अशा क्रमाने तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आपण लाईनमध्ये थांबा थोडा वेळ लागेल असे सांगितले. त्यावर आम्ही कोणाचीही  टेस्ट होऊ देणार नाही, तुम्ही काय करता ते बघतो, असे म्हणत दोघांनी या कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

टेबलवर असलेले साहित्य व काही नागरिकांचे घेतले स्वॅब देखील दोघांनी फेकून दिले. यामुळे स्वॅब सेंटरमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गोंधळ घालणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.