Chakan : सराईतांकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे हस्तगत; दोघे गजाआड

गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट तीनकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसांसह दोघांना खेड तालुक्यातील मरकळ भागातून जेरबंद करण्यात आले आहे. संबंधित दोघांनी ही घातक अग्निशस्त्रे विक्रीसाठी आणली होती. त्याआधीच पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांनी ही अग्निशस्त्रे नेमकी कुणाला विक्रीसाठी या भागात आणली होती याचा शोध पोलीस घेत आहेत.

सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय 24 वर्ष , रा. सोळू, ता.  खेड , जि. पुणे), सुरज अशोक शिवले ( वय 19 वर्ष,  रा. आपटी, ता. शिरूर, जि. पुणे), अशी या प्रकरणी शुक्रवारी (दि.२०) अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ( दि.१९) गुन्हे शाखेचे पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकातील विठ्ठल सानप व गंगाधर चव्हाण यांना माहिती मिळाली की दोन इसम आपल्याजवळ पिस्तूल बाळगून आळंदी रोड मरकळ येथे विक्रीसाठी येणार आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, यांनी पथकासह मरकळ भागात सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पिस्तु, एक रिव्हॉल्व्हर व तीन जिवंत काडतुसे अशी एक लाख 11 हजार 500 रुपये किमतीची शस्त्रे मिळून आली.  या दोघांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश कांबळे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.