Bhosari : दोन सराईत चोरट्यांना अटक; 10 लाखांचा ऐवज जप्त

चार पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघड; भोसरी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा आठ लाख 47 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 60 हज रुपये किमतीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील नऊ, निगडी, पिंपरी आणि खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (वय 33, रा. हडपसर), सचिन केरुनाथ पारधे (वय 31, रा. चिंभळी, ता. हवेली. मूळ रा. चंद्रापुर, ता. राहता, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात एकूण 13 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि 29 गुन्ह्यांमध्ये अटक झालेला एक आरोपी चाकण येथे जाण्यासाठी भोसरी बस स्टॉपवर येणार आहे. यानुसार भोसरी पोलिसांनी भोसरी बस स्टॉप परिसरात सापळा रचून संगतसिंग याला अटक केली. त्याच्याकडून 13.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 हजार 362 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 10 हजार रुपये रोख रक्कम असा 4 लाख 90 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आले.

भोसरी पोलिसांनी सचिन पारधे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने भोसरी, निगडी, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सात मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून त्याला अटक करून त्याच्याकडून 3 लाख 57 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले.

विधिसंघर्षित एका मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख 60 हजार रुपये किमतीच्या दोन कार जप्त केल्या. त्यातून भोसरी आणि खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

एकूण कारवाईमध्ये भोसरी पोलिसांनी 10 लाख 7 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील नऊ, निगडी, पिंपरी आणि खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे घरफोडी, वाहनचोरी, मोबाईल चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे, पोलीस हवालदार यु जी कदम, पोलीस नाईक जी एन हिंगे, पोलीस शिपाई एस एच डोळस, एस देवकर, एस एल रासकर, एन ए खेसे, एस बी महाडिक, एस वाय भोसले, बी व्ही विधाते यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.