Pimpri News : एकाच टोळक्यावर दरोड्याचे दोन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – एका तरुणाला लोखंडी रॉडचा धाक दाखवून पाच जणांच्या टोळक्याने खिशातून रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी एक आणि एका गॅरेज समोर पार्क केलेल्या  आठ वाहनांची तोडफोड करून एका कारमधून कारटेप चोरल्या प्रकरणी दुसरा दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 16) मध्यरात्री काळभोरनगर, पिंपरी येथे घडली.

सागर सुनील शहा (वय 21, रा. मोहननगर, चिंचवड), अविनाश गोपाळ हरिजन उर्फ अविनाश टाक (वय 21), मुकेश गणेश प्रसाद (वय 21, दोघे रा. मोरेवस्ती, चिखली), सागर पोळ, किरण वाघमोडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात काशीफ आरिफ खान (वय 27, रा. काळभोरनगर, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 16) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बॉम्बे सुपारी या दुकानाचे शटर चोरटे उचकटत आहेत, अशी माहिती फिर्यादी खान यांना मिळाली. त्यामुळे खान मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास त्यांच्या दुकानाकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकी दिली. धक्काबुक्की करून रॉडचा धाक दाखवून खान यांच्या खिशातून दोन हजार 150 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. रस्त्यावर दांडके आणि रॉड घेऊन गोंधळ करत सार्वजनिक शांततेचा भंग केला.

याच आरोपींच्या विरोधात दुसरी फिर्याद राजेश सुधाकर क्षीरसागर (वय 40, रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काळभोरनगर पिंपरी येथे गणेश ऑटोमोबाईल्स नावाचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजसमोर दुरुस्तीसाठी लावलेल्या आठ गाड्यांवर दगड, सिमेंट ब्लॉक मारून नुकसान केले. त्यातील एका कार (एम एच 14 / डी एफ 5886) मधून 15 हजार रुपये किमतीचा कारटेप चोरून नेला. त्यानंतर दांडके आणि रॉड घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.