Pimpri : हितेश मूलचंदानी हत्येप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी मिळून 23 वर्षीय हितेश मूलचंदानी या  तरुणाचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला.  याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतले होते.

अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा, योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (दोघे रा. सांगवी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यापूर्वी पिंपरी पोलिसांनी आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. शहाबाज शिराज कुरेशी (रा. कासरवाडी) आणि अरबाज शेख (रा. खडकी) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रोहीत किशोर सुखेजा (वय 26 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील दोन आरोपी औंध येथील स्पाइसर कॉलेज रोडवर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 24) रात्री पोलिसांनी स्पाइसर कॉलेज रोड परिसरात सापळा रचून लिंगा आणि लंगडा या दोघांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील जप्त करण्यात आली आहे. लिंगा आणि लंगडा दोघेही सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तर यापूर्वी पिंपरी पोलिसांनी आमिन फिरोज खान याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील शाहबाज आणि आरबाज हे दोघेजण अद्याप फरार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.