Pimpri News : नायजेरियातून आलेले दोघे पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले दोन आणि त्यांच्या संपर्कातील एकाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चिंचवड भागातील हे रुग्ण असून त्यांच्यावर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या नागरिकांचे ओमायक्रॉन’ व्हेरिएंट आहे का याच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग करिता एनआयव्ही येथे पाठविण्यात आले आहेत. नवीन व्हेरिएंट असलेल्या 12 देशात नायजेरियाचा समावेश नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले.

दोघी मायलेकी 25 नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी- चिंचवड शहरात आल्या आहेत. 37 वर्षाची आई आणि 12 वर्षांची मुलगी आहे. त्यांनी 25 नोव्हेंबरला नायजेरियात केलेली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह होती. परंतु, महापालिकेने 29 नोव्हेंबर रोजी केलेली चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

नायजेरियाला गेला नसलेला त्यांचा मुलगाही 30 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना जिजामाता रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटच्या तपासणीसाठी या नागरिकांचे घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगकरिता एनआयव्ही येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.

वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ज्या 12 देशातून येणाऱ्या नागरिकांचे सर्व्हीलन्स करायला सांगितले आहे. त्यात नायजेरिया देश नाही. आफ्रिका आणि युरोप देशामध्ये ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आढळून येत आहे. नायजेरिया देशात तो विषाणू अद्याप आढळून आलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. हे दोन रुग्ण परदेशातून आले असल्याने काळजी घेतली जात आहे. त्यांच्यावर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, आफ्रिका आणि युरोपीयन देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या – कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. मागील 15 दिवसांमध्ये परदेशातुन महापालिका कार्यक्षेत्रात आलेल्या नागरिकांची माहिती महापालिकेमार्फत कार्यान्वीत करण्यात आलेल्या कोविड हेल्पालाईन क्रमांक 8888006666 वर कळविण्यात यावी, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.