Chinchwad : दोन कचरा वेचक मुले मुस्कान पथकामुळे परतली घरी

एमपीसी न्यूज – घराचे आणि प्रसंगी देशाचे भवितव्य असणा-या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे तसेच हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या सुखरूपपणे स्वाधीन करण्याचे काम पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या मुस्कान पथकाकडून केले जात आहे. बुधवारी (दि. 11) आयुक्तालयाच्या मध्यवर्ती मुस्कान पथकाने दोन कचरा वेचक मुलांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. पालकांना मार्गदर्शन करून त्यांना समाजाच्या योग्य प्रवाहात आणण्याचे आवाहन पोलिसांनी पालकांकडे केले आहे.

धनराज उमेश जगताप (वय 6), सागर उमेश जगताप (वय 8, रा. देवकर वस्ती, भोसरी. मूळ रा. सेंदावा, मध्यप्रदेश), अशी त्या मुलांची नावे आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य, महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी 1 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या बालकांची शोध मोहीम, रस्त्यावर कचरा गोळा करणारी मुले, रेल्वे स्थानक, बस स्थानक, धार्मिक स्थळी भीक मागणा-या मुलांना त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यावर भर दिला जात आहे.

‘ऑपरेशन मुस्कान’ ही मोहीम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात देखील सुरु करण्यात आली आहे. आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक मुस्कान पथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच आयुक्तालयाचे एक मध्यवर्ती मुस्कान पथक नेमण्यात आले आहे. या मध्यवर्ती मुस्कान पथकाने बुधवारी (दि. 11) दापोडी, कासारवाडी रेल्वे स्थानक परिसरात कचरा गोळा करणा-या मुलांचा शोध घेतला. त्यात त्यांनी दोन मुलांना ताब्यात घेतले.

आई-वडील कचरा गोळा करण्याचे काम करतात म्हणून मुलेही कचरा गोळा करण्याचे काम करतात. असा धक्कादायक प्रकार मुस्कान पथकासमोर आला. मुलांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच पथकाने पालकांना देखील मुलांच्या शिक्षणाविषयी समजावून सांगितले आहे. ही मुले पवना नदीच्या किनारी तसेच रेल्वे स्टेशन परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करीत होती. त्यांचे आई-वडील देखील कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी मारुती जायभाये, दीपाली टोपे, आशा जाधव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.