Pimpri : दोन दुचाकी चोरांना अटक; चार गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून तीन दुचाकी आणि एक मोबाईल फोन जप्त केला. ही कारवाई चिंचवडमधील थरमॅक्स चौक आणि भाटनगर येथे करण्यात आली. 

अतुल चंद्रकांत निसरगंध (वय 19, रा. कुलस्वामिनी हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), सिद्धार्थ अनुप केदारी (वय 20, रा. डिलक्स टॉकीज मागे, शास्त्रीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड मधील थरमॅक्स चौकात एकजण थांबला असून त्याच्याजवळ चोरीची दुचाकी आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी थरमॅक्स चौकात सापळा रचून अतुल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने निगडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल आणि एक मोबाईल फोन चोरल्याचे कबूल केले.

अतुल याचा मित्र सिद्धार्थ याने पिंपरी भागातून एक दुचाकी चोरली असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भाटनगर परिसरात सापळा रचून सिद्धार्थ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पिंपरी मधील अशोक थिएटर जवळून एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. यावरून दोघांना अटक करण्यात आली. दोघांकडून तीन दुचाकी आणि एक मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 10 हजारांचा ऐवज जप्त केला. यामुळे निगडी, वाकड आणि पिंपरी पोलीस ठाण्यातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, पोलीस कर्मचारी भिवसेन सांडभोर, संपत निकम, धर्मराज आवटे, संजय गवारे, फारूक मुल्ला, नितीन बहिरट, शरीफ मुलानी, अश्विन बनकर, मयूर वाडकर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.