Pimpri : देहू ते पंढरपूरपर्यंत पालखी मार्गावर दुतर्फा रोपांची लागवड; रविवारी वनमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, श्री क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फाउंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरितवारी’ उपक्रमांतर्गत देहू ते पंढरपूरपर्यंत पालखी मार्गावर दुतर्फा रोपांची लागवड केली जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि. 28) निगडीत रोपे लागवडीचा शुभारंभ केला जाणार आहे. 

निगडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस स्थानक येथे रविवारी सकाळी दहा वाजता वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते रोपे लागवडीचा शुभारंभ केला जाणार आहे. यावेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार उपस्थित राहणार आहेत.

श्री क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फाऊंडेशन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हरितवारी उपक्रमांतर्गत देहू ते पंढरपूरपर्यंत पालखी मार्गाच्या दुतर्फा रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यांना महापालिका देशी रोपे पुरविणार आहे. त्यामध्ये वड, पिंपळ या रोपांचा समावेश आहे. तसेच हद्दीतील रोपांची देखभाल महापालिका करणार आहे.

दरम्यान, पिंपरी महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण, रोपांची लागवड केली जाते. यंदा दीड लाख रोपांची लागवड करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार महापालिकेने वृक्ष लागवडीला सुरुवात केली आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, पोलीस स्टेशन, पाण्याच्या टाकीच्या कडेने, रुग्णालये, क्रीडांगणे, उद्याने, महापालिकेच्या मालमत्ता या ठिकाणी 30 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. महामेट्रोमार्फत पचा हजार,  मिलिटरी हद्दीतील औंध कॅम्प येथे 35 हजार, देहूरोड, तळवडे, रुपीनगर येथील मिलिटरीच्या हद्दीमध्ये 30 हजार आणि दिघीतील हद्दीत 35 हजार, महापालिकेमधील गृहरचना संस्थामध्ये 10 हजार आणि महापालिका परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक, व्यक्ती, सामाजिक संस्था, कारखाने यांना पाच हजार मोफत रोपांचे वाटप केले जाणार आहे, असे दीड लाख रोपांची लागवड केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.