Bhosari News : मांजा कापल्याने दुचाकीस्वार जखमी; गळ्याला आठ टाके

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असताना अचानक पतंगाचा मांजाने गळ्याला कापल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वाराच्या गळ्याला आठ टाके पडले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी रस्त्यावर घडली.

कैलास पवार (वय 52, रा. पोलीस वसाहत, भोसरी) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास पवार सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून लांडेवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या गळ्याला काहीतरी चावले असल्याचा त्यांना भास झाला म्हणून त्यांनी गळ्याला हात लावून बघितला. त्यांच्या हाताला रक्त लागले आणि रक्तप्रवाह वाढू लागला. कैलास पवार यांनी स्वतः दुचाकी चालवत घर गाठले.

पवार यांच्या शेजा-यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या गळ्याला आठ टाके पडले आहेत. कैलास पवार हे एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. त्यांनी कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या पत्नी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.