Wanawadi : डुप्लिकेट चावी बनवून वेळोवेळी चोरी करणाऱ्या शेजारणीसह दोन महिला गजाआड!

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. शेजारणीने त्याच चावीच्या सहाय्याने डुप्लिकेट चावी तयार केली आणि एका मैत्रिणीच्या मदतीने घरात वेळोवेळी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आला आहे. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याच्या आरोपावरून वानवडी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.

भारती भगवान आसवानी (वय 60) आणि सुवर्णमला बूथवेल खंडागळे (वय 59) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी सपना जिग्नेश शहा (38) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी भारती आसवानी आणि फिर्यादी सपना शहा या एकाच सोसायटीत शेजारी-शेजारी राहतात. शहा बाहेर जाताना आसवानी यांच्याकडे घराची चावी ठेवून जात असत. भारती असवानी यांनी त्या चावीवरून डुप्लिकेट चावी तयार करून घेतली आणि शहा कुटुंबीय बाहेर गावी जाईल तेव्हा दोन्ही आरोपी महिला डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून चोरी करत असत. हा प्रकार जून 2018 ते फेब्रुवारी 2020 या काळात सातत्याने घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या कालावधीत फिर्यादी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घराचे कुलूप न तोडताही चोरी होत असल्यामुळे शहा कुटुंबीय हैराण होते. अखेर या प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्यासाठी त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला आणि त्याचा अक्सेस मोबाईलवर घेतला. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या भारती आसवानी यांना मुंबईला जात असून घराकडे लक्ष ठेवा असे सांगून ते निघून गेले. परंतु मुंबईऐवजी ते जवळच असणाऱ्या दुसऱ्या फ्लॅट राहण्यास गेले. ते निघून गेल्यानंतर आरोपी महिलांनी डुप्लिकेट चावीने कुलूप उघडले आणि बेडरुममधील कपाटातन शोधाशोध सुरू केली. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आणि फिर्यादीच्या मोबाईलमध्ये ती दृष्ये दिसू लागली. फिर्यादींनी तातडीने घरी धाव घेत आपल्या शेजाऱ्यांना घरात चोरी करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत दोन्ही आरोपी महिलांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.