Chinchwad Crime News : वृद्धेच्या फसवणूक प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पाच तोळ्याचे सोन्याचे मणी देते, असे सांगून एका वृद्ध महिलेची दोन चोरट्या महिलांनी 50 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.

याबाबत एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने शुक्रवारी (दि. 24) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्या महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी वृद्ध महिला या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम जवळ, चिंचवडगाव येथून पायी चालल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी महिलांनी त्यांना आवाज देऊन थांबविले. एका महिलेने सोबतच्या दुसऱ्या महिलेकडे हात दाखवून ‘हिच्याकडे खूप जास्त सोन्याचे मणी आहेत. हिला सोलापूरला जायचे आहे, तिच्याकडे पैसे नाहीत,’ असे म्हणून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.

त्या दोन चोरट्या अज्ञात महिलांनी फिर्यादी यांना पाच तोळे सोन्याचे मणी देतो, असे सांगून बाजूला नेले. महिलेकडून 20 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे भरवी मनी व दोन वाट्या असलेले मंगळसूत्र तसेच 10 हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे सोन्याचे दागिने घेतले. शिवाय रोख 19 हजार 500 रुपये असे एकूण 49 हजार 500 रुपयांची फसवणूक त्या महिलांनी केली.  परंतु, पाच तोळे सोन्याचे मणी मात्र दिले नाहीत. याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.