Pimpri: महापालिका सेवेतून वायसीएमएमचे दोन डॉक्‍टर बडतर्फ

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांचा आदेश, कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न, प्रशासन एक लाख रुपये बँक गॅरंटी जप्त करणार

एमपीसी न्यूज – कर्तव्यात कसूर केल्याचे दोषारोप शाबित झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएम) दोन डॉक्‍टरांना वैद्यकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. डॉ. श्रीराम तुळशीराम भंडारे आणि डॉ. राजीव शामराव शहारे अशी बडतर्फ केलेल्या डॉक्‍टरांची नावे आहेत. या दोन्ही डॉक्‍टरांची महापालिका प्रशासनाकडे असलेली एक लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली जाणार आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.

डॉ. श्रीराम भंडारे आणि डॉ. राजीव शहारे हे महापालिकेच्या वायसीएमएम रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या अत्यावश्यक सेवेतील गट ‘ब’ दर्जाच्या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) विभागाची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली होती. अत्यावश्‍यक सेवेत मोडणा-या वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी चोवीस तास कर्तव्यास बांधिल आहेत.

21 मार्च 2016 रोजी वायसीएममध्ये तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यासाठी डॉ. शिंगे हे अनुपस्थित होते. तर डॉ. भंडारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी बंद करून ठेवल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना या मृतदेहांचे शवविच्छेदन करावे लागले. याशिवाय 27 एप्रिल 2016 रोजी शवविच्छेदनासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीची पूर्वसूचना देऊनही हे दोन्ही अधिकारी अनुउपस्थित राहिले.

दोषारोप देखील केले मान्य
या दोन्ही डॉक्‍टरांनी नमून दिलेल्या कर्तव्यात नितांत सचोटी न राखता, हेतुपुरस्सरपणे केलेला हलगर्जीपणा आणि बेजबाबदार वर्तणुकीबाबत त्यांना सेवानिलंबित करुन, त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र. शवविच्छेदन गृहातील अत्यंत संवेदनशील कामकाज आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, त्यांचे सेवानिलंबन रद्द करून, त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु ठेवली होती. महापालिका आयुक्‍त हर्डीकर यांना प्राप्त झालेल्या अहवालात या दोन्ही डॉक्‍टरांवरील दोषारोप शाबित झाले. तसेच डॉ. भंडारे यांनी त्यांच्यावरील दोषारोप मान्यदेखील केले. याशिवाय डॉ. भंडारे हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करीत असून, विनापरवानगी गैरहजेरी लक्षात घेता, ते कर्तव्यावर रुजू होण्याची शक्‍यता नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. या दोन्ही डॉक्‍टरांना बचावासाठी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचा महापालिका प्रशासनाला अद्यापही खुलासा प्राप्त झालेला नाही.

या दोन्ही डॉक्‍टरांबाबत वैद्यकीय विभागप्रमुखांनी सादर केलेल्या खुलाशावरून, या दोन्ही डॉक्‍टरांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय या दोन्ही डॉक्‍टरांची एक लाख रुपयांची बँक गॅरंटीदेखील जप्त करण्याचे आदेश आयुक्‍त हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.