Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अंडाभुर्जीच्या गाडीवर ऑर्डर देण्यावरून झालेल्या वादात दोन तरुणांवर चॉपरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास पवनेश्वर चौक, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ज्ञानेश्वर बबन कापसे (वय 40), ओंकार राजेश्वर स्वामी (वय 18, दोघे रा. कापसे आळी, पिंपरीगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल बाबुराव टोणपे (वय 25, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल यांच्यासह त्यांचा मित्र किरण माछरला जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी राहुल हे त्यांचे मित्र किरण आणि सिद्धांत यांच्यासोबत पवनेश्वर चौकात अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले. त्यापूर्वी आरोपी तिथे होते. आरोपींनी त्यांची ऑर्डर प्रथम बनविण्यास सांगितले. त्यावेळी राहुल यांनी दोन ऑर्डरपैकी एक ऑर्डर आरोपीस घेण्यास सांगितले. यावरून आरोपी ज्ञानेश्वर याने ‘तू भाई आहेस का’ असे म्हणत धक्काबुक्की केली. तर इतर आरोपींनी राहुल यांना मारहाण केली.

आरोपी ज्ञानेश्वर याने राहुल यांच्या छातीत चाकूने मारून गंभीर जखमी केले. आरोपीच्या अन्य तीन साथीदारांनी राहुल यांचा मित्र किरण याला बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वरी याने राहुल यांच्या डोक्यात चॉपरने मारले. त्यावेळी राहुल यांनी चॉपरचे वार हातावर झेलले. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी ज्ञानेश्वर आणि ओमकार यांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.