Uddhav Thackeray : मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करत आहे!

एमपीसी न्यूज : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. फेसबुकवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर त्यांनी आपले मुख्यमंत्री पद त्यागत असल्याचे त्यांनी म्हंटले.

त्यांनी आपल्या संवादात म्हंटले, कि आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्यामध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून नाही घेऊ शकत.

पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात –

सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे. जातोही अनपेक्षितपणे. पण मी कुठेही जात नाहीये. मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपण इथेच आहोत. मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देतो आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.