Maharashtra News : उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे त्यांनी दसऱ्यालाच शिमगा केला – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे त्यांनी दसऱ्यालाच शिमगा केल्याची बोचरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली आहे. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महिलांवरील अत्याचार वाढत चालले त्याबद्दल काय करणार ते सांगतील असे वाटले होते, पण त्यांनी केवळ पुसट उल्लेख केला. महिलांसाठीचा कायदा का पेंडिंग आहे ते सांगितले नाही. शेतकऱ्यांचा आक्रोश चालू त्यावर काय करणार आहे, सांगितले नाही. शेतकऱ्यांना दहा हजार कोटी दिल्याची शेखी मिरवता मग त्याची फोड मांडा, कशाला काय दिले, रस्ते दुरुस्त करणे व धरणे दुरुस्त करण्यास दिले तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा, असा सवालही पाटलांनी उपस्थित केला.

स्वातंत्र्य लढ्यात कोठे होता असे विचारता. 1925 संघाची स्थापना झाली. प. पू. हेडगेवार हे क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी त्यांनी काही वर्षे संघ स्थगित ठेवला. मी लढ्यात उतरणार तुम्ही उतरा असे स्वयंसेवकांना सांगितले. स्वातंत्र्यानंतर संघाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. पण आणीबाणीत तुम्ही कोठे होता. इंदिरा गांधींनी लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला, हजारो पत्रकारांना – लाखो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले, त्यावेळी तुम्ही इंदिरा गांधींशी तडजोड केली. तुम्ही आज भारत माता की जय ची चेष्टा केली, वंदे मातरम ची चेष्टा केली. मुंबईत सैन्याचे संग्रहालय करणार म्हणून सांगितले मग अरबी समुद्र शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे गेल्या दोन वर्षात काय झाले सांगा, असे आव्हानही पाटलांनी उद्धव ठाकरेंना दिले.

आता खूप हिंदुत्व आठवू लागले, पण सहकारी पक्षाला विचारले का हिंदुत्वावर बोलणार आहे. सत्तेवर येताना सहकारी पक्षांनी आक्षेप घेतला म्हणून आघाडीतून शिव शब्द काढला. सत्तेसाठी हिंदुत्व बाजूला ठेवले. वारंवार बाबरी मशिद पाडण्याचे श्रेय घेता, पण एक तरी शिवसैनिक तेथे होता का? स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, कोणी याची जबाबदारी घेणार नसेल तर मी घेईन. पण राम मंदिराच्या उभारणीसाठीची धग मनामनात कोणी निर्माण केली तर संघाने निर्माण केली, संघापासून प्रेरणा घेणाऱ्या विहिंपने केली, हा लढा संघाने जनतेपर्यंत पोहचवला, त्यावेळी सैनिक कोठे होते? प्रत्यक्ष अयोध्येत तीन वेळा संघर्ष झाला त्यावेळी सैनिक कोठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या आधारावर बाबरी मशिद तुम्हीच पाडली आणि राम मंदिर पण तुम्हीच बांधले म्हणणार का? असा सवाल केला.

आजचा शिमगा चालू
आम्ही शब्द पाळला नाही म्हणाले, जर एवढी विचारांची चाड असती जर भाजपाने दगा दिला वाटते तर तुम्ही कोणाबरोबरच गेला नसता आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आणली असती. शेतकऱ्यांच्या समस्या, साखरधंदा अडचणीत, सोयाबीनचे भाव पडले, कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज फेडणाऱ्यांना मदत या कशावरही बोलले नाहीत. शिवसेनेने हिंदुत्वासाठी कधी लढे दिले, राम मंदिरासाठी काय केले, बाळासाहेबांनी एक वाक्य म्हटले त्यावर किती दिवस बोलणार, असा सवालही पाटलांनी केला.

सेना भाजपा जवळ येण्याचा विषयच नाही, भाजपा राष्ट्रवादी सोबत येण्याचा विषय नाही, आम्हाला सत्तेवर जाण्याची घाई नाही, आम्ही आमच्या टर्मवर चालणारे आहोत, भाजपा प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करेल, रोहित पवारांनी भगवा झेंडा उभा केला.आज उद्धवजींनी हिंदुत्वावर पूर्ण भाषण केले, संभ्रमच आहे असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.