‘UDID’ : दिव्यांगांनी एक एप्रिलपासून ‘UDID’ कार्ड बाळगणे सक्तीचे

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देशभरातील दिव्यांगांना येत्या एक एप्रिलपासून ‘युनिक डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.(‘UDID’) त्या धर्तीवर राज्य सरकारकडूनही दिव्यांगांना ‘यूडीआयडी कार्ड’ अनिवार्य करण्यात येणार असून, दिव्यांगांना जवळच्या रुग्णालयातून हे कार्ड देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागासह भारतीय कृत्रिम अंग निर्माण महामंडळ, राष्ट्रीय दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ, भारतीय पुनर्वसन परिषद आदी संबंधित संस्थांतर्फे दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ कार्ड अनिवार्य केले आहे.
Thergaon News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
‘यूडीआयडी’ कार्डामुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती या सरकार स्तरावर अधिसूचित होणार असून, केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी ‘यूडीआयडी’ (‘UDID’) संकेतस्थळावर नोंदणी करून आपले कार्ड काढून घ्यावे,’ असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उप आयुक्त संजय कदम यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.
– वैयक्तिक तपशील भरावेत. आधार क्रमांकाचाही उल्लेख करावा.
– दिव्यांगत्वाचा प्रकार निवडावा. बहुदिव्यांगत्व असल्यास नमूद करावे.
– आपल्या पत्त्याच्या जवळचे एक रुग्णालय निवडावे.
– दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठविले जाते.
– तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली जाते.
– त्यानंतर दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ कार्ड, प्रमाणपत्र दिले जाते.