Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, जगाला वेठीस धरणारं हे युद्ध थांबणार तरी कधी?

एमपीसी न्यूज (निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन) – युक्रेन युद्ध सुरू होऊन काल 24 फेब्रुवारीला (Ukraine War) एक वर्ष पूर्ण झाले. या युद्धाची महाभयंकर किंमत केवळ भारतच नाही, युक्रेन आणि रशियाच नाही तर संपूर्ण जग चुकवत आहे. या युद्धात पुढे काय होईल, या युद्धात आतापर्यंत नेमकं काय झालं, या युद्धात जगाचं काय नुकसान झालं, भारताचं काय नुकसान झालं, या विविध पैलूंचा या लेखात आढावा घेऊयात!

एक वर्षापूर्वी पुतीन यांनी हे युद्ध सुरू केलं, तेव्हा त्यांना वाटत होतं की, हे युद्ध फार-फार तर दोन-तीन आठवड्यात संपेल. रशियाच्या सुमारे दीड लाख सैन्याला घाबरून युक्रेन युद्धात शरणागती पत्करेल. पण तसं झालं नाही. युद्ध चालू राहिलं. रशियाची लष्करी ताकद आहे, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांचे सैनिक अनुभवी आहेत. अधिकारी हुशार आहे, तरीही ते युद्ध जिंकू शकले नाही. कारण युक्रेनचं नेतृत्व चांगलं आहे. युक्रेनचे नागरिक स्वतःच्या देशासाठी लढण्यास तयार आहेत. आणि अर्थातच त्यांना नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (NATO) हे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युद्ध संघटन आहे. त्यांनी शस्त्रांची प्रचंड मदत केली आहे. दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राचे सैनिक या युद्धात सहभागी झालेले नाहीत.

आज 20 टक्के युक्रेनवर रशियाचं नियंत्रण असल्याचं मानलं जातं, पण युक्रेनची राजधानी किव्ह ते कधीही जिंकू शकले नाहीत, हे महत्त्वाचं आहे. त्याचे कारण म्हणजे युक्रेनच्या सैन्याचं युद्धकौशल्य, लढण्याची क्षमता व सेनापतींची क्षमता होय. यामुळे सध्या हे युद्ध अनिर्णित अशा स्थितीत आहे, असंच म्हणावं लागेल. रशियाला त्यातून त्याचे लष्करी उद्दिष्ट साध्य करता आलेलं नाही तसेच रशियाला या युद्धातून हवं ते काहीही मिळालेलं नाही. अजूनही युक्रेन लढण्यासाठी तयार आहे.

युद्ध सुरू झालं (Ukraine War) तसं युरोप आणि अमेरिकेनं रशियावर आर्थिक बहिष्कार टाकला, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसून येत नाही. रशियाची अर्थव्यवस्था अजूनही चांगले काम करीत असल्याचं पाहायला मिळत आहे, पण त्याचे जगावर काय परिणाम झालेत, हे बघावं लागेल. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. युरोप, रशियात मंदी आली आहे. अमेरिकेतही मंदी येईल, चीनमध्ये सुद्धा मंदी येईल. फक्त भारताची अर्थव्यवस्था वेगानं पुढं जात आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात लढलं गेलेलं हे सर्वात मोठं युद्ध आहे. या युद्धात लढणारी राष्ट्रं युरोपियन होती. या युद्धात अतिशय अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात आला. रणगाड्यांच्या विरोधात अँटी टँक वेपन्स, विमानांच्या विरोधात अँटी एअरक्राफ्ट मिसाईल या शिवाय वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्रे, वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला. हे युद्ध म्हणजे तंत्रज्ञानाची शोधशाळा आहे, असं म्हटलं जातं.

रशिया, युरोप, अमेरिकेकडे असलेली सर्व नवीन अत्याधुनिक शस्त्रे या युद्धात वापरली गेली, मात्र तंत्रज्ञान विरुद्ध लढणारे सैनिक अशी लढाई झाली तर लढण्याची तयारी असलेले सैनिक व त्यांचे नेतृत्व चांगलं असेल तर ते उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचाही पराभव करू शकतात, हे या युद्धात दिसून आलं.

या युद्धात युद्धाचे सर्व प्रकार वापरले गेले. माहिती युद्ध, अपप्रचार युद्ध, दुष्टचर युद्ध, आर्थिक युद्ध, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रकार, डिप्लोमॅटिक वॉरफेअर (Ukraine War) असे युद्धकलेचे सर्व प्रकार वापरले जाऊन देखील अजूनही या युद्धाचा निकाल लागलेला नाही. या युद्धात युक्रेन हरेल असं वाटत नाही, त्याच बरोबर रशिया जिंकेल असंही वाटत नाही.

आता रशियावर एक मोठा परिणाम होताना दिसत आहे. रशियन सैनिक लढायला पुरेसे तयार नाहीत. त्यांच्याकडील दारुगोळा कमी पडत आहे. त्याचप्रकारची अडचण युक्रेनलाही जाणवत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात येते की, एखादं युद्ध असं वर्षभर लांब चालतं तेव्हा तुमच्याकडे किती लॉजिस्टीक स्टॅमिना किती आहे म्हणजे तुमच्याकडे किती दारूगोळा आहे, तुमची आर्थिक स्थिती किती मजबूत आहे, तुम्ही खर्च केलेला दारुगोळा पुन्हा एकदा बदलू शकता, हे फार महत्त्वाचं असतं. आता अमेरिका, युरोप, रशिया यांच्यासह संपूर्ण जगाकडील दारुगोळा संपला आहे, असंच पुढं दिसत आहे.

रणगाडे विरुद्ध अँटी टँक वेपन्सचा वापर केला गेला. त्यात अँटी टँक वेपन्सचा विजय झाल्याचं पाहायला मिळतं. रशियाकडून वायुसेनेचा फारसा वापर झाल्याचे दिसत नाही, कारण माणसाकडून वापरल्या जाणारी अँटी एअरक्राफ्ट मिसाईलमुळे रशिया घाबरून गेला. क्षेपणास्त्रांनी युक्रेनचा बराच भाग उद्ध्वस्त केला पण युक्रेनची लढण्याची भावना ते तोडू शकले नाही. अत्याधुनिक शस्त्रांमुळे खूप खर्च व विध्वंस झाला, मात्र अजूनही युद्ध अनिर्णितच आहे.

युद्धाची आकडेवारी द्यायची झाली तर रशियाचे एक लाखाहून अधिक सैनिक तर युक्रेनचे एक ते दीड लाख सैनिक मारले गेल्याचं बोललं जातं. युद्धकैद्यांची संख्या मोठी आहे. सर्व प्रकारच्या मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणावर हनन केलं जातंय. शस्त्रांमुळे मोठा विध्वंस झाला. हजारो नागरिक मारले गेले. ३० ते ४० हजार मुले मारली गेली. अनेक स्त्रियांवर अत्याचार केले. हे कोणी केलं तर… अर्थात जास्त रशियानं केलं… आणि थोड्या फार प्रमाणात युक्रेननंही केलं.

युक्रेनची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. ती पुन्हा ठीक होण्यासाठी खूप कालावधी लागेल. युद्ध केव्हा संपेल, कोणीच सांगू शकत नाही. आतापर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालंय, यापुढंही होत राहील, हे मात्र नक्की.

या युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला, हे पाहूयात. हे युद्ध जगासाठी खूप मोठं संकट होतं, मात्र भारतानं या संकटाचं संधीत रुपांतर केलं. जगाची अर्थव्यवस्था मंदीत जात असताना, भारत हा असा एकमेव देश आहे की, ज्याची अर्थव्यवस्था सहा ते सात टक्के रेटने वाढत आहे. एवढंच नाही तर सुमारे २४ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकत होते. युद्ध थांबवायला लावून त्या विद्यार्थ्यांना परत भारतात आणून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन केलं. हे खूप मोठं काम होतं. अन्न-धान्य सुरक्षा जपली. महागाई वाढू दिली नाही. अन्न-धान्य निर्यात करण्याचा प्रयत्न केला. त्यातही भारताला चांगलं यश मिळालं. रशियाकडून कमी किमतीत क्रूड ऑईल घेऊन पेट्रोल-डिझेलची दरवाढ नियंत्रणात ठेवली. क्रूड ऑईलवर भारतात प्रक्रिया करून अमेरिका, युरोपला पेट्रोल-डिझेल निर्यात करीत आहोत.

आपण दोन वेगवेगळ्या होड्यांवर पाय ठेवले होते. पण भारताने उत्तम संतुलन साधले. अमेरिका आणि रशिया यांना भारतानं त्यांच्या बाजूनं असावं, असं वाटत होतं. आपण दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवले. अमेरिकेला सांगून रशियाकडून क्रूड ऑईल मिळवले. युद्धाचा भयंकर परिणाम होऊनही आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं चांगल्या पद्धतीनं रक्षण केलं.

हे युद्ध थांबवायचं असेल तर केवळ भारतच महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, अशी परिस्थिती आहे. भारताचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. भारताच्या मध्यस्थीनं युद्ध थांबलं तर ते भारताचं फार मोठं राजनैतिक यश असेल. त्यामुळे भारताची जगातील किंमत आणखी वाढण्यास मदत होईल. अनेक देश भारताशी मैत्री करण्यासाठी उत्सुक आहेत. आताच आपल्याकडे जी-20 चे नेतृत्व आलं आहे. अनेक देश ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत भारतात येऊन शस्त्रनिर्मिती करायला तयार आहेत.

एकमेकांना अणुबॉम्बची धमक्या देणं, चालूच राहील. पण आशा करूयात की, दोन्ही देश समजूतदारपणा दाखवतील, शांतीच्या दिशेनं पाऊल टाकतील आणि युद्ध थांबेल. त्यात युक्रेन आणि रशियाचंच नाही तर संपूर्ण जगाचं भलं आहे. त्यातून जगाची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभारी घेऊ शकेल. येणाऱ्या काळात युद्ध थांबण्याची शक्यता फार कमी आहे, पण तशी आशा करायला हरकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.