Talegaon Dabhade : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना न्याय देण्याचे काम सुरू – रामदास आठवले

एमपीसी न्युज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दहा लाख युवकांना सरकारी नोकरी प्रदान करण्याचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना न्याय देण्याचे काम सुरू आहे. ज्यांना नोकरी मिळते ते फार नशीबवान असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंब स्थिर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाकडून युवकांसाठी राबविण्यात येणारा सरकारी नोकरीच्या भरतीचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दहा लाख युवकांना सरकारी नोकरी प्रदान करण्याचा मानस आहे. यामधील 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र दि 22 नोव्हेंबर रोजी देशातील विविध ठिकाणांवरून देण्यात आली.त्यामध्ये सीआरपीएफ केंद्र तळेगाव दाभाडे येथे युवकांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाच्या प्रसंगी 200 युवकांना सामाजिक न्याय विभाग केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आठवले बोलत होते.

Talegaon Dabhade : तर डाॅ बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 200 कोटी रुपये मिळवून देऊ – रामदास आठवले

यावेळी वित्तमंत्रालयाचे महाप्रबंधक विजयकुमार कांबळे, दूरसंचार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आर. के. जायभाये, रक्षा मंत्रालयाचे उपमहाप्रबंधक प्रदीप महाडेश्वर, एचएएलचे उपमहाप्रबंधक मिलिंद लाटकर, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक दर्शनलाल गोला, धीरज कुमार आदी मान्यवर व्यासपीठावरती होते. तर लाभार्थी कर्मचारी नियुक्तीपत्र घेण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे आत्तापर्यंत 47 कोटी लोकांनी बँक अकाउंट काढले आहे. नऊ कोटी महिलांना गॅस देण्यात आला आहे. सर्वच काम एकदम होत नसतात. ते पूर्ण होण्यासाठी काही काळ लागतो. सर्वांना न्याय देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. केंद्र शासनाच्या नोकर भरतीच्या बरोबर राज्य शासनाच्या वतीने देखील नोकर भरती होत आहे. याचा फायदा युवकांनी घ्यावा असे मत नामदार आठवले यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रास्ताविक,स्वागत उपमहानिरीक्षक समूह केंद्र पुणेचे राकेश कुमार यांनी केले. सूत्रसंचालन उप कमांडेंट रमेशसिंह बिष्ट यांनी केले, तर आभार कमांडेंट समूह केंद्र पुणे कवींद्रकुमार चंद यांनी केले. याप्रसंगी लाभार्थी युवकांना नियुक्तीपत्र वाटण्याचा कार्यक्रम पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.