Talegaon News : खोदलेले रस्ते पावसाळ्या पूर्वी पूर्ववत करा : आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज : तळेगाव शहरात चालू असलेल्या भुयारी गटर योजना आणि पाणी पुरवठा योजनेची खोदकामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ववत करा असे आदेश तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारांना मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.

शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषद सभागृहामध्ये प्रशासन अधिकारी व नगरसेवक यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या सभेला उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, मंगल भेगडे, हेमलता खळदे, संगीता शेळके तसेच मुख्याधिकारी दीपक झिंजाड व उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे सह प्रशासकीय अधिकारी,ठेकेदार उपस्थित होते.

या सभेत भुयारी गटर योजना आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या पाईपलाईन खोदाईचे काम अतिशय मंदगतीने चालल्या बद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली. कामात सुस्तपणा का आहे.याचा जाब संबधितांना विचारला. तर त्यातील काहीना तंबी देखील दिली. एका महिन्यात पुन्हा कामाचा आढावा घेऊ असा इंशारा यावेळी दिला.

 चालू असलेली कामे येत्या ३१ मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावीत असे आदेश यावेळी संबंधितांना दिले. त्यानंतर शहरातील खोदकाम झालेले सर्व रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव द्यावेत. त्यासाठी लागणारा निधी विशेष बाब म्हणून देईन,  तसेच शहराच्या विकास कामासाठी किती निधी हवा याचे प्रस्ताव नगरसेवकांनी प्रशासनाकडून पाठवावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना काम का सुरु केले नाही, अशी विचारणा प्रशासनास केली. यावर फेर प्रस्ताव पाठवावा अशी सूचना यावेळी आमदारांनी केली. याशिवाय शहरातील पणन मंडळाचा रस्ता, जिजामाता चौक ते घोरवडी स्टेशन रस्ता.  एमएसइबी ते चाकण रोड पर्यतचा रस्ता,आयबीपी पंप ते टेलिफोन एक्शेंज पर्यंत रस्ता या रस्त्याचे आराखडे त्वरित मार्चपूर्वी सादर करण्यासाठी सूचना केल्या.त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असेही सांगितले.

या सभेत व्यापारी संकुलामधील गाळे वाटपाबाबत सखोल माहिती घेतली तर शिल्लक गाळे वाटपाबाबत धोरणात्मक निर्णय करून ते वाटप करावेत असे सांगितले,या सभेपूर्वी तळेगाव शहरामध्ये चालू असलेल्या व रखडलेल्या अनेक कामाची प्रत्यक्ष पाहणी आमदार शेळके यांनी केली. तसेच आढावा बैठकीला गैरहजर राहण्या ऐवजी उपस्थित राहून शहर विकासाची विकास कामे सुचविली असती तर अधिक निधी प्राप्त करता आला असता अशी खंत देखील आमदार शेळके यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी स्वागत व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.