Pimpri News : अविस्मरणीय नृत्यसम्राट पं बिरजू महाराज महोत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – नामवंत संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने पहिला नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज महोत्सव कथक महायज्ञ नुकताच पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यामध्ये पं बिरजू महाराज यांच्या ज्येष्ठ शिष्या पद्मश्री शोवना नारायण (दिल्ली) व पं बिरजू महाराज यांचे सुपुत्र पं दीपक महाराज यांनी बहारदार कथक नृत्य सादर केले. प्रारंभी पं बिरजू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज पुरस्कार वितरणसोहळा संपन्न झाला. संस्थेच्या वतीने देण्यात आलेला हा पहिला पुरस्कार जागतिक कीर्तीच्या कथक नर्तिका पद्मश्री शोवना नारायण यांना कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर पं. बिरजू महाराज यांचे सुपुत्र पं. दीपक महाराज यांना माजी आमदार उल्हास पवार व माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल, पं. बिरजू महाराज जींच्या फोटोची प्रतिमा असे होते. यावेळी लिज्जत पापड समूहाचे अध्यक्ष श्री सुरेश कोते, आई सी सी आर च्या पुणे विभागाच्या संचालीका निशी बाला, पिंपरी चिंचवड विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कथक नर्तक पं डॉ नंदकिशोर कपोते, सुनील महाजन , निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भाषणात पदमश्री शोवना नारायण म्हणाल्या ” मला गुरूच्या नावाने मला हा जो पुरस्कार मिळाला आहे हे मी माझे भाग्य व गुरूंचा आशीर्वाद समजते. डॉ नंदकिशोर कपोते यांनी आपल्या गुरूंच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे त्यातून त्यांची गुरूप्रति अगाध भक्ती दिसून येते. ”

तर पं. दीपक महाराज म्हणाले,” या पुरस्कारामुळे माझ्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. माझे वडील पं. बिरजू महाराज यांची ही नृत्य परंपरा मी पुढे नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. नंदकिशोर कपोते यांनी या पहिल्या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे”. कृष्णकुमार गोयल म्हणाले ” पं. बिरजूमहाराज या दिग्गज कलाकाराच्या नावाने हा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांनी सुरु केला ही अभिमानाची गोष्ट आहे.”

तर उल्हास पवार म्हणाले ” या राष्ट्रीय पुरस्कारामुळे आज पद्मश्री शोवना नारायण व पं.दीपक महाराज यांचे दर्शन आज पुणेकरांना घडले. त्यांच्या अप्रतिम नृत्याचा आस्वाद सर्वांना घेता आला”. यावेळी निशी बाला,मोहन जोशी,सुषमा शिंदे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर पं.दीपक महाराज यांनी कथक नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी थाट चे मनमोहक प्रकार , तकिट तकिट घिन लडी, जोरदार जुगलबंदी आदी प्रकार सादर केले. त्यानंतर पदमश्री शोवना नारायण यांनी कथक नृत्य सादर करून रसिकांवर मोहिनी घातली. या 74 व्या वयात ही त्यांनी विविध लयकारी, तोडे, चककर पेश करून प्रेक्षकांना आश्चर्य चकित केले. गौतम बुद्धा वरील यशोधरा अभिनय सादर करुन त्यांनी सर्वांना मोहीत, भाव विभोर केले. प्रेक्षकांनी उभे राहून टाळयांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती रामदासी यानी केले तर मानपत्राचे वाचन किरन जावा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.