Article by Harshal Alpe : उत्स्फूर्ततेला महत्त्व देऊन चित्रपटसृष्टी उज्वल करणारा एकच कादर खान!

एमपीसी न्यूज (हर्षल आल्पे) – एकेकाळी आपल्या खुसखुशीत संवादांनी आणि उत्स्फूर्त अभिनयाने दर्दी रसिकांच्या गळ्यातला ताईत असणारा एक अवलिया ज्याचा आज जन्म झाला. खरंतर आता वाढदिवसाऐवजी या दिवसाला जयंतीच म्हणावी लागेल नाही का? म्हणा.. अशावेळी जयंती हा शब्दच तोकडा वाटतो कारण कादर खान सारखं व्यक्तिमत्व या दुनियेतून जाणे अशक्य! जे केवळ रसिकांच्या हृदयात आजही आपले अढळ स्थान राखून आहे. आजही त्यांचे चित्रपट बघताना पदोपदी जाणीव होते की ही व्यक्ती खरोखर एक वेगळीच होती.

त्यांची कॅमेरा फेस करण्याची एक अलौकिक शक्ती ही निराळीच होती. कॅमेरा आपल्याजवळ बोलवून लॉंग शॉटचा क्लोज अप करण्याची हातोटी, निरनिराळ्या पात्रांमध्ये एक वेगळाच जीव टाकून विनोदाची आतिषबाजी करता करता मध्येच डोळ्यात पाणी आणत एक छान संदेश देण्याची कला कादर खान साहेबांमध्ये होती. ही कलाच कादरखान साहेबांना इतरांपेक्षा वेगळे करत होती.

खरोखर, कादरखान साहेबांची चित्रपटसृष्टीतील एन्ट्री ही वेगळ्याच धाटणीची होती. एकदा त्यांच्या एका नाटकाला एक निर्माते आले होते. त्यांनी पाहिलं आणि कादर खान साहेबांना “माझ्या चित्रपटाचे संवाद लिहिशील का? अशी विचारणा केली. या प्रश्नावर कादर खान साहेब बुचकळ्यात पडले. कारण त्याआधी त्यांनी नाटके लिहिलेली होती पण चित्रपट लिहिण्याचा त्यांना अनुभव नव्हता. तो निर्माता मोठा होता, पैसेही चांगले मिळत होते. कादर खान साहेबांची त्यावेळची परिस्थिती पाहता ते ही ऑफर नाकारूही शकत नव्हते.

लगेचच कादरखान साहेब म्हणाले, प्रयत्न करतो आणि असं म्हणत तिथून ते निघाले. नरीमन पॉइंट येथे एका फुटबॉल मैदानाजवळ आले आणि एका चौथऱ्यावर बसून त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि तासा-दोन तासात त्यांचा चित्रपट लिहूनही झाला आणि ते पुन्हा त्या निर्मात्याच्या कार्यालयावर दाखल झाले. त्यांच्या अचानक येण्याने निर्मात्याचा त्यांच्यावरचा विश्वास डळमळीत झाला होता पण जेव्हा कादर खान साहेबांनी अख्ख्या चित्रपटाचे संवादच त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा त्या निर्मात्याला विश्वासच बसेना.

ऐंशी नव्वद पाने त्यांनी फक्त दोन तासात लिहून पूर्ण केली होती आणि ते संवाद खूपच सशक्त होते. निर्मात्यांनी त्यांना लगेच त्यांच्या कामाचे पैसे दिले आणि तो चित्रपट पूर्णही झाला आणि कादर खान साहेबांसारखा हिरा या चित्रपट सृष्टीला मिळाला. एका मुलाखतीत कादर खान साहेबांनीच हा किस्सा सांगितला होता.

असरानी , शक्ती कपूर, गोविंदा, महानायक अमिताभ बच्चन यांची कला खऱ्या अर्थाने मोठी झाली, समृद्ध झाली ती कादर खान साहेबांच्या मार्गदर्शनामुळेच! खरंच कादरखान साहेबांना यांच्या जयंतीनिमित्त मनापासून सलाम आणि त्यांच्या बहारदार कारकिर्दीला हा मानाचा मुजरा…….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.