Pune : सिग्नलवर साहित्य विक्री करणा-या मुलांना इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे गणवेश

एमपीसी न्यूज – रस्त्यावर, सिग्नलवर आणि चौकासारख्या ठिकाणी पोस्टर, लिंबू मिरची, फुगे विकणा-या मुलांच्या शाळेत इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने 35 गणवेश वाटप केले. ख-या अर्थाने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. दिग्विजय प्राथमिक विद्यालय, धनकवडी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल, आरती मुळे आदी उपस्थित होत्या.

घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने शाळेचा खर्च या पालकांना पेलवत नाही. त्यांना मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदतीची अतिशय गरज असते. त्याच उद्देशातून इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने गणवेश वाटपाचा उपक्रम या शाळेत घेतला.

अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल म्हणाल्या, “रस्त्यावर, सिग्नलवर उभे राहून शोभेच्या किरकोळ वस्तू, लिंबू मिरचीची तोरणे, फुगे, पोस्टर विक्री करणा-या लोकांची मुले धनकवडी येथील दिग्विजय प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेतात. अशा प्रकारे विक्री करणा-या लोकांची मुले पुढे जाऊन अशाच पद्धतीने किरकोळ वस्तू विकतात आणि आपली गुजराण करतात. काही वेळेला ही मुले लहान-मोठ्या चो-या करून गुन्हेगारी मार्गाकडे देखील वाळलेली पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे अशा मुलांना योग्य वेळी शाळेचा रस्ता दाखवणे अतिशय गरजेचे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका घाटगे या सर्व मुलांची व्यवस्था बघतात.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.