Gram Panchayat Election Results : हिवरे बाजार ग्रामपंचायतमध्ये पोपटराव पवार यांचा एकतर्फी विजय

एमपीसी  न्यूज : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारं ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे.

हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनलने सातही जागांवर विजय मिळवलेला आहे. आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदारांनी सकाळपासूनच यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.

गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले. ग्रामस्थांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. अन्य निवडणुका सोडल्या, तर ‘ईव्हीएम’ आल्यानंतर झालेली ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली.

दरम्यान पोपटराव पवार यांच्यामुळे 1990 पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे गेले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.