Union Budget 2021 : आत्मनिर्भर नव्हे पूंजीपती निर्भर भारत अर्थसंकल्प : डॉ. अमोल कोल्हे

एमपीसीन्यूज : आत्मनिर्भर भारत म्हणून मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात पूंजीपती निर्भर भारत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यावर डॉ. कोल्हे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यंदाच्या अर्थसंकल्पात गगनाला भिडलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही योजना नाही. तसेच अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सतत न्यूमोकोकल वॅक्सिनचा उल्लेख केला.

परंतु, कोरोनावर गुणकारी लस भारतीयांना मोफत मिळणार का ? यावर काहीच भाष्य केलेले नाही, याकडे डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले.

सरकारी संपत्तीचे परिक्षण करण्याचा सरकारचा मनोदय चिंताजनक असून रेल्वे, बंदरे, पोस्ट यासह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या काही मोजक्या भांडवलदारांच्या ताब्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारी मिळकती विकून पैसा कमवणे अतिशय गंभीर व धोकादायक बाब असल्याचे खासदार डॉ, कोल्हे यांनी सांगितले.

कोविड संकटामुळे करदाता सर्वसामान्य माणूस अक्षरश: कोलमडून पडला आहे. या करदात्यांना कसलाही दिलासा या अर्थसंकल्पात मिळालेला नाही.

केवळ तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार केला असल्याचे दिसते. एकूणच केवळ आकडेवारीची उड्डाणं असलेला असे या अर्थसंकल्पाचे विश्लेषण डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

नागपूर, नाशिक मेट्रोचा समावेश या अर्थसंकल्पात केला ही आनंदाची बाब आहे, मात्र पुणे मेट्रोसाठी भरीव तरतुदीच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची सर्वाधिक करांच्या रुपाने तिजोरी भरणाऱ्या मुंबईला या अर्थसंकल्पात काहीच मिळालेले नाही, याकडे डॉ. कोल्हे यांनी लक्ष वेधले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.