Union Budget News : केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून ‘यूनियन बजेट ॲप’ लॉंच

एमपीसी न्यूज : केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आला आहे. अर्थसंकल्प छपाईला प्रारंभ करण्यापूर्वी अर्थमंत्रालयात हलवा तयार करण्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘युनियन बजेट ॲप’ लॉंच केले आहे.
इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये हे ॲप असणार आहे. ॲड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्रणालींसाठी हे ॲप असून www.indiabudget.gov.in या संकेतस्थळावरून हे ॲप डाऊनलोड करता येऊ शकेल.
2021-22 चा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीस सादर होणार आहे. देशातील नागरिकांना अर्थसंकल्पाची सर्व माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हे ॲप लॉंच करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाची कागदपत्रे ही संसदेचे सदस्य व सामान्य नागरिक यांना सहजपणे वाचता यावीत, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे ॲप लॉंच केले गेले आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (NIC), आर्थिक कार्य विभागाच्या (DEA) मार्गदर्शनाखाली हे ॲप तयार करण्यात आले.
या मोबाईल ॲपमध्ये 14 केंद्रीय अर्थसंकल्पाची कागदपत्रे, अर्थ विधेयके, वार्षिक बजेट, डिमांड फॉर ग्रान्ट्स, आदी सर्व कागदपत्रे पाहण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. डाऊनलोड, प्रिंट, सर्च, झूम, बाह्य लिंक अशी अनेक फिचर्स यांत आहेत.
मात्र, अर्थमंत्र्यांनी सभागृहात बजेटचे भाषण पूर्ण केल्यावर ही कागदपत्रे ॲपवर उपलब्ध होतील.