Maharashtra News : महाराष्ट्रातील 100 कुंभार कुटुंबांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते इलेक्ट्रिक चाके प्रदान

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील 100 कुंभार कुटुंबांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक चाके प्रदान केली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तिकरण योजनेअंतर्गत कुंभारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हे वाटप करण्यात आलं आहे. या कुंभारांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने दहा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

कुंभार व्यवसायाची संबंधित साहित्यांचे वाटप करण्यात आलेले कुटुंब नांदेडमधील दहा तर परभणीतील पाच गावातील आहे. या साहित्य वाटपामुळे कुंभार समुदायातील सुमारे चारशे जणांना लाभ होणार आहे. या इलेक्ट्रिक चाकांमुळे कुंभारांचे उत्पादन वाढून परिणामी उत्पन्नही वाढणार आहे आणि हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तीकरण योजनेचे कौतुक केले देशातील कुंभारांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर सुरू करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. समाजात दुर्लक्षित राहिलेल्या कुंभार समुदायाला सक्षम करणं आणि लोप पावत चाललेल्या कुंभार कलेचं जतन करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. कुंभार सशक्तिकरण योजनेअंतर्गत योग्य प्रशिक्षण आणि आणि आधुनिक साहित्याचं वाटप यामुळे उत्पादकता आणि उत्पन्न यामध्ये कित्येक पटींची वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील इतर दुर्गम भागातही या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले.

सरकारचे सहाय्य प्राप्त झाल्यामुळे कारागिरांनी आनंद व्यक्त केला असून यापैकी काही कुंभारांसोबत यावेळी गडकरी यांनी संवाद साधला इलेक्ट्रिक चाके वापरल्यामुळे उत्पादन वाढणार असून त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत उत्पन्नात तीन ते चार पटींनी वाढ होणार आहे असं ते म्हणाले.

खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले की आतापर्यंत अशी 18,000 इलेक्ट्रिक चाके देशभरातील कुंभारांना देण्यात आली असून त्याचा सुमारे 80,000 लोकांना लाभ मिळाला आहे.

कुंभार सशक्तीकरण योजनेमुळे कुंभारांच्या मासिक उत्पन्नात सुमारे सात हजार रुपयांची वाढ झाली असून ते आता दहा हजार प्रति महिना इतके झाले आहे असेही सक्सेना यांनी यावेळी नमूद केले.

देशातील प्रत्येक कुंभाराला सक्षम बनविणे हे या कार्यक्रमाचे एकमेव उद्दीष्ट असून केव्हीआयसी हे लक्ष्य साध्य करण्यात कसलीही कसर सोडणार नाही, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.