Fuel Inflation : इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुण्यात अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढीचा चटका दिवसेंदिवस सामान्यांना चांगलाच पोळून काढत आहे, याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काॅंग्रेसने जोरदार निदर्शने करत इंधन दरवाढी विरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत जे भाषण केले होते, ते भाषण भोंग्यावर लावून हे आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकारकडून सतत इंधन दरवाढ केली जात असून त्यामुळे सामान्यांचे जगणे मुश्किल झाल्याची टीका यावेळी पुण्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली. दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “2014 मध्ये पेट्रोल 60 आणि गॅसची टाकी 400 रुपयांच्या आसपास होती. आता हेच सात वर्षांत दरवाढ होत होत पेट्रोल 120 आणि गॅस हजाराच्या घरात गेले आहे. त्यामुळे आता कसे जगायचे हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांंमध्ये निर्माण झाला आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अनेक सभा घेत महागाईवर भाषणं केली आणि आता त्यांना महागाईचा विसर पडला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आज भोंग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं लावून आंदोलन करत आहोत”, असे म्हणून जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.