Maval Mews : त्र्यंबकेश्वर येथील नवरा सुळक्यावरून तरुणांनी दिल्या सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांचे चाहते संबंध महाराष्ट्रभर आहेत. राज्याच्या विविध भागातून त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सात तरुणांनी त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पहीने गावातील खडतर, उंच नवरा सुळक्यावर चढाई करून शुभेच्छांचा फलक झळकवून तरुणांनी आमदार शेळके यांना शुभेच्छा दिल्या. ‘आण्णा, तुम्ही मावळ तालुक्याला विकासाच्या शिखरावर घेऊन जात असताना येणाऱ्या काळात आपणासही मंत्रीमंडळात स्थान मिळावे’, अशी भावना तरुणांनी व्यक्त केली.

मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास बाळगून आमदार सुनिल शेळके यांनी गेल्या दोन वर्षात विकास कामांसाठी राज्य सरकारकडून 711 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून आणला. आमदार सुनिल शेळके हे आपल्या मतदार संघातील कोणत्याही कामासाठी सदैव  कार्यरत असतात. अश्या या लोकनेत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा संकल्प मावळ येथील सात तरुणांनी केला.

मावळ तालुक्याला विकासाच्या शिखरावर घेऊन जाण्याचे स्वप्न बाळगलेल्या आमदारांना एखाद्या शिखरावर जाऊन शुभेच्छा देण्याचे ठरविले आणि यासाठी त्यांनी निवड केली, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील पहिने गावातील नवरा-नवरी सुळक्यांपैकी खडतर अश्या नवरा सुळक्याची,

नवरा सुळक्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी 06 कि.मी. चा ट्रेक करावा लागतो. त्यानंतर 260 फुटांपेक्षा उंच असणाऱ्या नवरा सुळक्यावर दोऱ्यांच्या सहाय्याने चढाई करावी लागते. या तरुणांनी भर पावसात या अतिकठीण व निसरड्या झालेल्या शारिरीक मानसिक कसोटी पाहणाऱ्या सुळक्यावर चढाई केली. नवरा सुळक्याच्या माथ्यावर चार जणांनाही नीट उभे राहणे अवघड आहे. अश्या ठिकाणी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा फलक झळकावून आपल्या लाडक्या नेत्याला या सात जणांनी शुभेच्छा दिल्या.

“आण्णा, तुम्ही मावळ तालुक्याला विकासाच्या शिखरावर घेऊन जात असताना येणाऱ्या काळात आपणांसही मंत्रीमंडळात स्थान मिळावे” अशी भावना या वेळी तरुणांनी मावळच्या जनतेच्या वतीने व्यक्त केली.

सदर मोहिमेत नितीन पिंगळे, दत्ता म्हाळसकर, विशाल गोपाळे, प्रकाश वरघडे, अमोल सुतार, अक्षय साळुंके, राहुल भालेकर हे सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.